शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: कर्जमाफीची प्रक्रिया सुरू! करा ‘हे’ महत्त्वाचे काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित ‘ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया आता जवळपास निश्चित झाली असून, त्या दृष्टीने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जरी अद्याप ही कर्जमाफी नेमकी कोणत्या वर्षापर्यंतच्या थकीत कर्जासाठी असेल किंवा चालू कर्जाचा यात समावेश असेल का, याबाबत पूर्ण स्पष्टता नसली तरी, बँकांच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शेतकरी संघटनांनी २०२५ मधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचाही यात समावेश करण्याची मागणी केली आहे, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले असून प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
कर्जमाफीच्या प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. सध्या सहकारी बँकांच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सोसायट्यांकडून कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, भरलेले हप्ते आणि थकबाकी यासह त्यांचा आधार नंबर आणि फार्मर आयडी यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. या डेटाचा वापर कर्जमाफीची व्याप्ती ठरवण्यासाठी केला जाणार आहे.



















